कशी तुले गोड लागे घरामधी साखर
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
राबतो रानात एकला सोबती न कोणी र
पायात नाही काही फिर जसा प्राणी र
कधी काय घडल त्याच हाय काय र खर
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
मिल ना त्याले कधी चांगल चांगल खायाला
फिल्टरच पाणी नाही त्याला कधी प्यायाला
ठेश्याला ढूसन्या देऊन आज बी त्यो खातो र
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
नवकोट नारायण नाही मव्हा बाप र
साता जन्माची दलिंदरी हाय त्यात र
फाटक धोतर त्याच्या नशिबाला बांधल
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
कष्टाले मोल नाही जगन बेताल र
जगू नाही देत त्याले हे मत्कुण हे फार र
कुठ कुठ डसतीया ती नाही पारावार र
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
अक्षरशत्रू जरी नाही मव्हा बाप र
फुटतो आजही त्याला शिक्षणाचा पाझर
कधीतरी बदलण सारं अशी खोटी त्याला आस र
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
आतातरी येईल का बळीच हे राज र
जगतय म्हतार या आशेवर आज र
किती केल तरी हे झोपलं सरकार र
बांधावर बसून मव्हा बाप खाई भाकर
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
गणेश पुरी सिमनगावकर
